लोकल बॉडी इलेक्शन (फोटो- सोशल मीडिया)
तीन वर्षांनी अखेर महापालिकेच्या निवडणुका जाहीर
पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत
निवडणूक आयोगाने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम
पिंपरी/ अमोल येलमार: मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी अखेर सोमवारी महानगरपालिकेच्या (PCMC)निडणुका जाहीर झाल्या असून इच्छुकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2017 ला झालेल्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता तो यंदा पाहायला मिळणार नाही. यंदा भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशी (Local Body Election) तिरंगी लढत होणार आहे.
पिंपरी चिंचवड तसा राष्ट्रवादी कॉग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला होता. मात्र शहरातील दोन नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि शहराचे राजकारण बदलले. अजित पवारांचे विशेष लक्ष असणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपल्याला नागरिक निवडून देतील हा त्यांचा अंदाज खोटा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आली. अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठींबा दिला.
“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट
2022 साली महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला मात्र त्यानंतर राज्यात महानगरपालिकेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच नाहीत. दरम्यानच्या काळात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आणि त्याचे प्रतिसाद खाली उमटत गेले. शहरातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन गटाचे पदाधिकारी सक्रिय झाले. त्यांमुळे प्रत्येकाला संधी मिळेल या आशेने इच्छुकांनी काम सुरु केले. निवडणुका आज लागतील उद्या लागतील म्हणत तब्बल 3 वर्षे गेली.
सोमवारी निवडणुकाच्या तारख्या जाहीर झाल्या. सध्य परस्थिती मध्ये पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ जास्त दिसत आहे. 2017. मध्ये निवडून आल्यापैकी नगरसेवक रवी लांडगे आणि तुषार कामठे हे दोघेच पक्षातून बाहेर पडले आहेत. मात्र 2017 मधील भाजपचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी मध्ये दोन गट झाल्याने तेथे विभाजन झाले. तिथेही अजित पवार गटाकडे जास्तीचे संख्याबळ दिसत आहे. शिवसेनेची काही मोजके नगरसेवक होते. त्याच्यातही विभाजन झाले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे गटाची शिवसेना भाजप सोबत युती करण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सोबत लढणार असल्याचे चित्र आहे. इतर पक्ष स्वतंत्र लढणार की कोणाला पाठींबा देणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार आणि महाविकास आघाडी अशी होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
२०१७ पक्षीय बलाबल….
(३२ प्रभाग, १२८ नगरसेवक)
भाजपा – ७७
राष्ट्रवादी – ३६
शिवसेना – ९
अपक्ष – ५
मनसे – १
यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता.






