
श्रीराम कारखान्याची चिमणी पुन्हा पेटली! ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; रामराजेंचा माजी खासदारांवर निशाणा
सोमवारी दि. १२ ऑक्टोबर झालेल्या हंगामाच्या शुभारंभामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या अडचणींमागे राजकीय डावपेच असल्याचा आरोप करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. ‘आपला ऊस आपल्याच श्रीराम कारखान्याला द्या,’ असे आवाहन करत त्यांनी सभासदांना एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. कारखान्यात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन व बॉयलर अग्निप्रदीपन करून सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
कारखान्याची निवडणूक दीड ते पावणेदोन वर्षे लांबल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे रामराजे यांनी सांगितले. सहकार विभाग आणि साखर आयुक्तांचा अहवाल मागवून निर्णय घेतला असता, तर तक्रारी टाळता आल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले. या घडामोडींमागे माजी खासदारांचे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आदर व्यक्त करतानाच त्यांच्या नावाचा आधार घेऊन सहकारी संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे रामराजे म्हणाले. विकासकामे रोखणे, सहकारी कारखान्यांना अडचणीत आणणे आणि बँकांवर नियंत्रण मिळविण्याचे राजकारण केल्याने पक्षाचा विस्तार होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
अडचणीच्या काळात कामगारांनी केलेला त्याग आणि सभासदांनी दाखविलेली एकजूट यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्यास मदत झाल्याचे रामराजे यांनी नमूद केले. कारखान्याचे भागभांडवल पूर्ण करून आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी सभासदांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. माजी खासदारांनी त्यांच्या कारखान्याच्या संचालकांची नावे, उसाचे गाळप, साखर उतारा आणि देणी यांची माहिती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. संबंधित कारखान्यात काटामारी होत असल्याचा आरोप करत साखरवाडी आणि श्रीराम हे दोन्ही कारखाने आपण वाचविल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या संसारावर राजकीय स्वार्थामुळे परिणाम होत असेल, तर वयाच्या ७८ व्या वर्षीही रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.
कारखाना सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि परिसरातील व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, नियमित गाळप, कारखान्याचे आर्थिक स्थैर्य आणि ऊस उत्पादकांना योग्य मोबदला मिळवून देणे ही व्यवस्थापनापुढील महत्त्वाची आव्हाने असतील. दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आगामी हंगामातील उसाचे उत्पादन पाणीवाटपाच्या नियोजनावर अवलंबून राहणार असल्याचेही रामराजे यांनी नमूद केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, धनंजय पवार, अमोल सस्ते, भगवान होळकर, जितेंद्र पवार,दत्ता बापू अनपट, रेश्मा भोसले यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद व वाहतूकदार उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक संतोष खटके यांनी केले, तर सुखदेव बेलदार यांनी आभार मानले.