पीएमपीएमएलचा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; तब्बल 'इतक्या' बस केल्या उपलब्ध
पुणे : पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध करून दिली जाते. २०२३–२४ या शैक्षणिक वर्षात एकूण ७२ बसगाड्या विद्यार्थ्यांच्या सेवेत होत्या, तर २०२४–२५ मध्ये हा आकडा वाढून ७९ वर गेला आहे. २०२३–२४ या वर्षीच्या आकडेवारीनुसार, पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ४८ बसगाड्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १८ बसगाड्या, तर खाजगी उपक्रमांतर्गत ३ बसगाड्या विद्यार्थ्यांच्या सेवेत होत्या. याशिवाय, अटल बिहारी वाजपेयी कॉलेजला ३ बसगाड्यांची सोय करण्यात आली होती.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये, पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ५७ बसगाड्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २२ बसगाड्या, असे करून एकूण ७९ बसगाड्यांची सोय विद्यार्थ्यांच्या सेवेत करण्यात आलेली आहे. या बससेवेसाठी पीएमपीएमएलकडून ९२ रुपये प्रति किलोमीटर दराने संबंधित महापालिकांकडून भाडे आकारले जाते. ही सेवा केवळ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मर्यादित असून, विशेषतः गोरगरीब आणि उपेक्षित वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरते.
महापालिकेच्या शाळेसाठी ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, शाळेच्या मागणीनुसार बस संख्या वाढविण्यात येईल, या बस सेवेचा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
– नितीन नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल