
Police raid two ladies dance bars in Vadgaon Maval Crime News update
Crime News : वडगाव मावळ | सतिश गाडे : मावळ तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या लेडीज डान्सबारविषयी दैनिक नवराष्ट्रने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात डान्सबार बंदीच्या मागणीसाठी लक्षवेधी मांडली होती. त्यामुळे डान्सबारचा मुद्दा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.
या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिसांनी कठोर भूमिका घेत पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या डान्सबारवर धडक कारवाई केली आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हे फाटा व साते परिसरातील “गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार” आणि “विश्वदीप (फ्लेवर्स) ऑर्केस्ट्रा बार” येथे पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली.
गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई
दि. 12 डिसेंबर 2025 रोजी वडगाव मावळ पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून कान्हे येथील गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार येथे छापा टाकला. तपासादरम्यान शासनाने दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी उदय चक्का सालियन (वय 49, रा. गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार, कान्हे, ता. मावळ), दिनेश कृष्णा शेट्टी (वय 46, मुळ रा. ठाणे, सध्या रा. कान्हे, ता. मावळ) आणि किर्तन के. सी. टी. (वय 27, रा. गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार, कान्हे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता
ऑर्केस्ट्रा रंगमंचावर केवळ ८ कलाकारांची मर्यादा असताना ११ महिला कलाकारांना मंचावर ठेवण्यात आले, कलाकारांनी दर्शनी भागावर ओळखपत्र परिधान केले नव्हते, तसेच नियमांपेक्षा मोठा रंगमंच उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
साते येथील विश्वदीप (फ्लेवर्स) बारवरही कारवाई
साते (ता. मावळ) येथील विश्वदीप ऑर्केस्ट्रा बार येथेही परवाना अटींचा भंग झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी बारचे प्रोप्रायटर व चालक मनिष सुवर्ण कुमार (वय 62, रा. साते, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. येथेही रंगमंचावर ठराविक मर्यादेपेक्षा अधिक कलाकार, ओळखपत्रांचा अभाव व नियमबाह्य रंगमंच आढळून आला.
कायद्यांतर्गत गुन्हे दाखल
डान्सबार कारवाईच्या या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे व मद्यपानगृहे (बार रूम) मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 8(1) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली असून, पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख करीत आहेत. डान्सबारविरोधातील या कारवाईमुळे मावळ तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.