महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी 'बडी कॉप' योजना राबवावी; युवक काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी
पुणे : रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या व महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेसाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सुरु केलेली बडी कॉप योजना पुन्हा राबवावी. बीट मार्शल व दामिनी पथकाच्या गस्तीचे प्रमाण वाढवावे. तसेच बोपदेवघाट अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली. याबाबत लवकरच पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोहन सुरवसे पाटील नेमकं काय म्हणाले?
पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी, अशी आमची मागणी आहे. निर्जनस्थळी पोलीस चौकी अद्ययावत करण्यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तारावे, गस्तीच्या वेळी सायरनचा वापर केला पाहिजे. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जनस्थळी गस्त वाढवली पाहिजे. पुरेसा उजेड असेल, अशी व्यवस्था करावी.
अडीचशे पेक्षा अधिक बलात्कारांच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे. पीडिताना तातडीने न्याय मिळण्यासाठी सखोल करून पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे. मात्र, अनेकदा पोलिसांकडून राजकारण्यांच्या, बड्या धेंडांच्या दबावाला बळी पडून तपास नीटपणे केला जात नाही. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठाना, राजकारण्यांना न जुमानता पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. कायद्याचा धाक राहील, असे वातावरण पुणे पोलिसांनी निर्माण करावे, असे पुणे शहर पोलीस आयुक्तांना आवाहन करतो. असे पाटील म्हणाले.