
चिकन, मटन, अंड्याचे दर कडाडले; पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
यंदा प्रथमच अंड्याचा शेकडा दर ७२० रुपये शेकड्यापर्यंत गेला असल्यामुळे अंड्याचे बाजार भाव घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढले असून, किरकोळ अंडे ८ रुपये प्रमाणे ९६ रुपये डझन विकले जात आहेत. यंदा प्रथमच अंड्याचा बाजारभाव ७२० रुपये शेकड्यापर्यंत गेला असल्याचे अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात, निकेतन दैने, माया थोरात यांनी सांगितले आहे. तसेच बॉयलर कोंबडी यांचा लिफ्टिंग रेट दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे बाजारभाव १२२ रुपये किलोच्या पुढे गेल्यामुळे बॉयलर कोंबडीचे चिकन किरकोळ विक्रते सध्या २२० ते २४० रुपये किलो दराने विकले जात असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन सेंटरचे विक्रेते इसाक शेख, महाराष्ट्र चिकनचे इम्रान मोमीन, भारत चिकनचे व होलसेल कोंबडीचे व्यापारी जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली.
गेली काही महिने अंड्याचे दर गडगडल्याने अनेक अंडी उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन बंद केले होते. त्यामुळे अंड्याचा तुटावडा जाणवतो. त्यामुळे बाजारभाव वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. – प्रमोद हिंगे पाटील (ऊर्जा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, निरगुडसर फाटा)
बकऱ्याच्या मटणाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली असून बकऱ्याचे मटण ७६० ते ८०० रुपये किलो दराने विकले जात असल्याची माहिती एकलहरे येथील चॉईस मटन शॉप बकराचे व्यापारी शेखर कांबळे, मंचरचे बाबा मटणचे शारुफ इनामदार यांनी दिली. ढाब्यांवर मार्गशीर्ष महिन्यात मोठ्या प्रमाणावर मांसाहाराला उठाव असल्याचे कळंब येथील तिरंगा धाब्याचे नितीन भालेराव, यशोधनचे तन्मय कानडे, एकलहरे येथील हॉटेल व्यवसायिक रामचंद्र गाडे, अर्जुन डोके, निलेश डोके यांनी सांगितले.
थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे चिकन-मटनलाही मागणी वाढली आहे. बाजारपेठेत चिकन-मटन याचे उत्पादन कमी असून, मागणी जास्त असल्यामुळे बाजारभाव वाढल्याची शक्यता आहे. -शफीभाई मोमीन, आंबेगाव ऍग्रो शिनोली.