पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
यवत : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने तातडीने “ओला दुष्काळ” जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या संदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे पिके, शेती, घरे, गोठे, जनावरे व अन्न, धान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून, या अस्मानी संकटकाळात सरकारने तातडीने मदतीचा हात द्यावा.
मोठ्या उद्योगपतींना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय कर्जमाफी व मदत दिली जाते, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत पंचनामे, सर्व्हे अशा अटी लादल्या जातात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आज शेतकऱ्यांना केवळ घोषणांची नव्हे तर ठोस आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारने जाहीर केलेली २२०० कोटींची मदत ही तुटपुंजी असल्याचे सांगत आंबेडकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून वसूल होणाऱ्या कोटींच्या सेसचा उपयोग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या काय आहेत?