जयपूर पिंक पॅंथर्सने जोरदार कमबॅक करीत सामना केला अनिर्णित, यू-मुम्बाला रोखले बरोबरीत
पुणे : प्रो-कबड्डी लीगमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेला जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यातील प्रो कबड्डी स्पर्धेचा सामना २२-२२ असा बरोबरीत सुटला. पूर्वार्धात यु मुंबा कडे १२ विरुद्ध ८अशी चार गुणांची आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यातील सामना ही अतिशय चुरशीने खेळला गेला. सांघिक कौशल्याच्या जोरावर यु मुंबा संघाने मध्यंतराला १२-८ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात जयपूर संघाच्या खेळाडूंनी पकडी व खोलवर चढाया असा खेळ करीत त्यांची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
पाच मिनिटे बाकी असताना १८-१८ बरोबरी असताना सामना फिरवला
शेवटची दहा मिनिटे बाकी असताना १५-१५ अशी बरोबरी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना १८-१८ अशी बरोबरी होती. चार मिनिटे बाकी असताना जयपूर संघावर लोण चढविण्याची मुंबा संघाला संधी होती मात्र या संधीचा लाभ त्यांना घेता आला नाही. जयपूर संघाकडून अंकुश राठी याने पकडी मधील २०० गुणांचा टप्पा ओलांडला. जयपुर संघाकडून रेझा मीर बाघेरी यांनी गुण नोंदवले रोनक सिंग व निरज नरवाल यांनीही त्याला चांगली साथ दिली. यु मुंबा संघाकडून रोहित राघव याने चार गुण तर सोमबीर याने सात गुण नोंदविले.
दुसरीकडे दबंग दिल्लीने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले, सुरुवातीपासूनच सामन्यात चुरस
दबंग दिल्ली व युपी योद्धा यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस होती. आठव्या मिनिटाला सात सात अशी बरोबरी होती मात्र नंतर युपी योद्धाने तीन गुणांची आघाडी घेतली खरी तथापि दिल्ली संघाने जोरदार चढाया करीत मध्यंतराला १३-१२ अशी नाममात्र आघाडी मिळवली. त्यावेळी दिल्ली संघाला यूपी संघावर लोण नोंदवण्यासाठी हुकमी संधी मिळाली होती. ही संधी उत्तरार्धात ते कसे पार पाडतात ही उत्सुकता होती.
हेही वाचा : IND VS AUS : पहिल्या कसोटीचा स्टार्कने यशस्वी जयस्वालकडून घेतला बदला, टीम इंडियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये
उत्तरार्धात पहिल्याच चढाईत यूपी योद्धाच्या भरत याने एक गुण मिळवीत १३-१३ अशी बरोबरी केली खरी मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला कारण दिल्लीच्या नवीन कुमार याने पुढच्या चढाईत दोन गडी बाद करीत यूपी संघावर लोण चढविला. लोण नोंदवल्यानंतर दिल्ली संघाने खेळावर आपले नियंत्रण ठेवले होते युपी योद्धा संघाच्या खेळाडूंनी ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सहा मिनिटे बाकी असताना त्यांनी दिल्ली संघावर लोण चढविला आणि पुन्हा आघाडी मिळविली. पाच मिनिटे बाकी असताना यूपी योद्धा संघ २८-२५ असा आघाडीवर होता. दिल्ली संघाकडून आशू मलिक व नवीन कुमार यांनी अनुक्रमे ११ व ८ आठ गुण नोंदविले. यूपी संघाकडून गगन गौडा (१३ गुण), व भवानी रजपूत (१० गुण) यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.