बारामतीत प्रहार संघटना आक्रमक; अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन
बारामती/ अमोल तोरणे : राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
राज्यातील दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन द्यावी, बेघर, भूमीहीन दिव्यांगांना घरासाठी नऊ गुंठे जागा द्यावी, राज्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना दहा टक्के आरक्षण द्यावे, औद्योगिक वसाहती मध्ये दिव्यांगांना चार टक्के रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका हद्दीतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे, स्टॉल द्यावे, औंध रुग्णालय या ठिकाणी दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीतून दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे काम सूरू आहे, मात्र या कामात प्रचंड अनियमितता सुरू असून याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर करवाई करावी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाची पुणे येथील इमारत प्रशस्त पद्धतीने बांधण्यात यावी, या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे राज्याचे अर्थखाते आहे, त्यामुळे लाडकी बहिण योजनेसाठी त्यांनी निधीची तरतूद केली त्याप्रमाणे दिव्यागांना ६,००० रूपये प्रति महिना पेन्शन देण्यासाठी निधीची तरतूद करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी आंदोकांनी केली. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आंदोलकांशी चर्चा करुन मागण्या मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली.
यावेळी शासकीय अधिकारी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर, संपर्क प्रमुख ज्ञानदेव मिंढे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेचे तीन महिन्यांचे पैसै सोडले, मात्र दिव्यांगाना तीन महिने झाले त्यांची पेन्शन मिळाली नाही. त्याचबरोबर निराधार जेष्ठ नागरीक, विधवा महिला यांचे देखील पैसै मिळाले नाहीत. या घटकातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अजितदादांनी आम्हा दिव्यांग व्यक्तींसाठी लाडकी दीव्यांग योजना अजितदादा यांनी जाहीर करावी. आमच्यातील बेघरांना जागा व निवारा उपलब्ध करुन द्यावा, ज्याप्रमाणे पदवीधर तसेच शिक्षकांना मतदार संघ आहेत, त्याप्रमणे आम्हा दिंव्यांगांना १० टक्के राजकीय आरक्षण द्यावे.
– अनिता कदम (महिला जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.)