वाशीम : जिल्ह्यातील ५६३ गावांसाठी ५३९ योजना कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनांसाठी लागणारा खर्चास आराखड्यानुसार ३०९ कोटी ६१ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गावागावात विकासकामे गती घेणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.( Shanmukhraj S. ) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जल जीवन मिशन कार्यक्रमाचा (Jal Jeevan Mission) आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष कोरे, पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व्ही. आर. वेले आणि जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या अ आणि ब वर्गवारीच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८६ योजना २८८ गावांसाठी असून आराखड्यानुसार १२७ कोटी ५८ लाख रुपयांची आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९९ गावांसाठी १२१ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमार्फत नवीन २५३ योजना २७५ गावांसाठी तयार करण्यात येत असून यासाठी १८१ कोटी ८६ लाख रुपये तरतूद आराखड्यानुसार करण्यात आली आहे. एकूण ५६३ गावांसाठी ५३९ योजना असून आराखड्यानुसार ३०९ कोटी ६१ लाख रुपये तरतूद आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९९ गावांसाठी ७१ योजना असून त्यासाठी १५१ कोटी ६५ लाख रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्याने दिली. सभेला जल जीवन मिशनशी संबंधित यंत्रणांचे इतरही अधिकारी उपस्थित होते.
कामांना गती द्या : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच मिशनची कामे सध्या कोणत्या टप्प्यात आहेत. पाण्याचे स्रोत कोणते आहेत. तसेच रेट्रो फ़िटिंगच्या कामाच्या प्रगतीची व प्रलंबित नळजोडण्याची माहिती देखील यावेळी घेत कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.