
जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप
मेढा / दत्तात्रय पवार : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, मुख्य मार्ग बंद होणे, रस्त्यांचे नुकसान, वाहतूक विस्कळीत होणे अशा आपत्तीजनक घटना सातत्याने घडत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 तास सतर्क राहून आपत्कालीन उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
असे असताना सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह त्यांच्या पूर्व विभागातील उपअभियंता, सर्व शाखा अभियंता असे एकूण ८५ कर्मचारी उत्तर प्रदेशातील वृंदावनसह इतर पर्यटनस्थळांच्या सहलीवर सहकुटुंब १७ जुलैपर्यंत गेले आहेत. सध्या बांधकाम विभागाचे हे कार्यालय ओस पडलेले आहे. तर या सहलीची चर्चा रंगू लागली आहे.
जिल्ह्यात पावसामुळे अनेक रस्त्यांवर दरडी कोसळत असून, काही ठिकाणी वाहतूक पुलांची पडझड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा वेळी घटनास्थळी तातडीने पोहोचून यंत्रणा कार्यान्वित करणे, यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, ठेकेदारांशी समन्वय साधणे आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारीच जिल्ह्याबाहेर असल्याने अनेक कामांवर याचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने निर्णय प्रक्रियेला विलंब होऊन, स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे दरडी हटविणे, रस्ते सुरू करणे आणि तातडीच्या दुरुस्तीची कामे वेळेत होणार नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनातील प्रत्येक विभागाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे शासनाचे निर्देश असतात. अशा वेळी संपूर्ण विभागाने सहकुटुंब सहलीचे नियोजन करणे योग्य होते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्टची परिस्थिती असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी जिल्हा सोडून कसे गेले व सहलीवर गेलेल्या अधिकाऱ्यांची रजा मंजूर न करता विना वेतन कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनांकडून व नागरिकांतून होत आहे.
याच अधिकाऱ्यास नुकतीच मिळाली मुदतवाढ
बांधकाम विभागाचे सहलीवर गेलेले या कार्यकारी अभियंता महोदयांनी आपला कार्यकाल पूर्ण करून बदलीस पात्र झाले होते. मात्र, त्यांची बांधकाममंत्र्यांनी बदली न करता मुदतवाढ दिली. त्यामुळे विशेष चर्चेत असलेले हे अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत सहलीवर गेल्याने पुन्हा एकदा बांधकाममध्ये त्यांच्या कार्यपद्धतीची खुमासदार चर्चा रंगली आहे.