
Satara News : राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे; जिल्हा परिषदेत जोरदार राडा! राजू भोसले-राजू शेळके आमनेसामने
सातारा दि १० (प्रतिनिधी ) : राजवाडा परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. प्रस्तावाला विरोध करत सदस्य राजू शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. काही काळ सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.
चर्चेदरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी विरोध करणाऱ्या सदस्यांना थेट लक्ष्य करत, “लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, लोकांसाठी काम करा. विकासकामांमध्ये अडथळे आणू नका,” अशा शब्दांत राजू शेळके यांना खडे बोल सुनावले. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी रंगली.
राजवाडा परिसरातील ही जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यास शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील, असा सत्ताधारी सदस्यांचा दावा होता. तर विरोधकांनी जागा हस्तांतरणाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रस्तावाला विरोध कायम ठेवला.
गदारोळाच्या वातावरणात अखेर हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यामुळे राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला.
या निर्णयामुळे शहरातील प्रस्तावित विकासकामांना चालना मिळणार का, की हा मुद्दा पुढेही राजकीय संघर्षाचे कारण ठरणार, याकडे आता साताऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.