
Pune Police, Amitesh Kumar, Pune Court, Security Audit
Pune News: न्यायालयाच्या आवारात आरोपीना मिळणारी मोकळीक तसेच सुरक्षेतील गंभीर त्रुटीं व आरोपीं भेटण्यासाठी म्हणून येणाऱ्या साथीदार तसेच मित्रांबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयात तारखेला आणलेल्या आरोपींना नातेवाइकांची मुक्त भेट, वाहनात बसून गप्पा, हॉटेलमधून जेवण, मोबाइलवर संभाषण, तसेच अमली पदार्थांची देवाण-घेवाण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक ताशेरे ओढत न्यायालय परिसराचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हे ऑडिट केले जात आहे.
एकप्रकारे न्यायालयीन कामकाज काही गुन्हेगारांसाठी जणू पर्यटन बनल्याचे पोलिस यंत्रणेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता यावर कठोर कार्यवाही होणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर पडलेला कैदी कारागृहात परतताना त्याच्याकडे गांजा सापडल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. याप्रकरणात निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय २१, रा. हडपसर) या कैद्यावर गुन्हा नोंदवला. अधिक तपासात पुणे पोलिसांना हा गांजा न्यायालयातील स्वच्छतागृहात त्याला एकाने दिला असल्याचे समोर आले. आता त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यामुळे याची गंभीर दखल पुणे पोलिसांनी घेत न्यायालयाचे सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याचा न्यायालय परिसर ते चाकण असा पाठलाग करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालय आवारात देखील टोळी युद्धातून मोठी घटना घडण्याची शक्यता गृहित धरून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी न्यायालयाच्या आवारात टोळी युद्धातून खूनाची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती घडू नये, असेही एका अधिका-यांनी भिती व्यक्त केली आहे.
पान, तंबाखू, अमली पदार्थ तसेच संशयास्पद वस्तू न्यायालयात नेण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. न्यायालय परिसरात अत्यंत कड़क तपासणी आणि शिस्त राखण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. न्यायालय परिसरातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीद्वारे सुनावणीवर भर न्यायालयीन तारखाना आरोपींना आणण्याऐवजी सुनावणीवेळी त्यांना सीसीटीव्हीद्वारे हजर करण्यात येत आहे, परंतु, काही ठरावीक वेळा आरोपींना न्यायालयात आणले जाते. मात्र, तेही शक्य तितके कमी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आरोपींना न्यायालयात आणताना निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी अधिक कठोर करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे आणि अन्य कारणांमुळे सुरक्षेत आलेली शिथिलता दूर करून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाणार आहे.
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाना चकवा देत आरोपीच्या मित्राने थेट बाथरूममध्ये गांजा पोहोचविल्याने संबंधितांची खरडपट्टी काढली होती. ‘न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आरोपीपर्यंत अमली पदार्थ पोहोचतोच कसा? अशी हिंमत होते कशी?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणात आरोपीसह गांजा पुरविणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.
परिसराचे मायक्रो सुरक्षा ऑडिट
प्रत्येक प्रवेशद्वारावर कडक तपासणी
सीसीटीव्ही कव्हरेज आणि ब्लाइंड स्पॉट्सची पाहणी
आरोपी व नातेवाइकांच्या भेटीवर निर्बंध
मोबाईल, तंबाखू, अमली पदार्थांवर बंदी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
बंदोबस्तावरील पोलिसांची जबाबदारी निश्चित करून उत्तरदायित्व वाढविणार