
Someshwar Sugar Factory, Shahaji Kakade, Sunetra Pawar
राज्यभरात नावाजलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सभासदांची अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर सहकाराचे अभ्यासक व कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की, मी कारखान्याचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी व क्षमतेपेक्षा जास्त चालणारा सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्याचा फायदा आजच्या गाळपालाही होत आहे. फुले २६५ या नव्या वाणाला राज्यभरातून विरोध होत असताना सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात या वाणाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देऊन त्याची मोठी लागवड केली.
नुसतं थैमान अन् उपद्रव! पिंपरी-चिंचवडमध्ये Dengue चा डंख; ऑगस्टच्या पंधरवड्यात तब्बल…
जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेतला. गेटगेन उसावर अवलंबून असलेला सोमेश्वर कारखाना स्वयंपूर्ण केला. त्यामुळे माझ्या कारकिर्दीबाबत मी अत्यंत समाधानी आहे. मुगुटराव आप्पांनी दिलेली दिशा व देशाचे नेते शरद पवार, अजित पवारांची भक्कम साथ यामुळे कारखान्याचा कायापालट करता आला या गोष्टीचे मनापासून समाधान वाटते.
सध्या कारखान्याचे आर्थिक स्थिती चांगली आहे. कारखान्याने दिलेला भाव समाधानकारक आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची कर्जे नाहीत. लागणाऱ्या कर्जाची नियमित परतफेड होत आहे. त्यामुळे सभासदांनी वाढीव भावाची अपेक्षा करताना व्यवहार्य मागणी करावी.
मात्र येणाऱ्या निवडणुकीत माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकत आहे. अजितदादांचे अकाली निधन हा तालुक्याला व पर्यायाने सहकार क्षेत्राला बसलेला मोठा धक्का आहे. सहकारी संस्थांवर ज्या लाखो लोकांचा प्रपंच अवलंबून आहे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजित दादांचे कारखान्याच्या कामकाजावर बारकाईने लक्ष असायचे. सरकारकडून लागेल ती मदत तात्काळ व्हायची. जर काही कारणांनी सहकारी संस्था अडचणीत आल्या तर अजितदादांचे नसणे हे त्याचे प्रमुख कारण असेल.
Supriya Sule Emotional Post for Ajit Pawar: तू अचानक येशील अन् ..;सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार हे सहकारी संस्थात लक्ष घालत आहेत ही चांगली बाब आहे. मात्र काही चुकीची मंडळी संचालक मंडळात आली तर कारखाना डबघाईला यायला वेळ लागणार नाही. येणारी दोन-तीन वर्ष साखर उद्योगासाठी चांगली आहेत. ऊस उत्पादक सभासदांचा फायदा व्हायचा असेल तर त्यासाठी संचालक मंडळाची धोरणे चांगली असायला हवीत.
संचालक मंडळात चुकीची मंडळी यायला नकोत याची काळजी सुनेत्रा पवारांनी घ्यावी. त्यासाठी त्यांना लागेल ती मदत करण्याची माझी वैयक्तिक तयारी आहे. कारखान्याचे गाळप वाढले आहे, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प वाढले आहेत, शिक्षणसंस्था मोठी झाली आहे. कारखान्यावर परिसराची बाजारपेठ अवलंबून आहे त्यामुळे संचालक मंडळ निवडताना सुनेत्रा पवारांनी योग्य खबरदारी घ्यावी त्यासाठी आपण त्यांना मदत करायला तयार असल्याचे शहाजी काकडे यांनी सांगितले.