पुणे पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; नागरिकांना दिलं मोठं आश्वासन
पुणे : कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जात असलेल्या पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कोरेगांव पार्क परिसरात पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, अडचणी जाणून घेत त्यांनी नागरिकांना त्या सोडविण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. यांवेळी वाहतूक प्रश्न तसेच अवैध स्टॉलबाबत नागरिकांनी त्यांच्यासमोर अडचणी मांडल्या.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोरेगांव पार्क परिसरातील नागरिकांच्या समस्येच्या अनुषंगाने कोरेगांव पार्कमधील गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातसह नॉर्थ मेन रस्ता येथे पाहणी केली. मध्ये अचानक पायी पेट्रोलिंग केले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.
कोरेगाव पार्क परिसरात वाहतुकीची समस्या भीषण आहे. दररोज सायंकाळनंतर नॉर्थ मेन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तर, उर्वरित रस्त्यांवर अतिक्रमणे, पदपथवरील विक्रेत्यांचा अडसर, वाहनांचे बेकायदा पार्किंग अशा समस्या आहेत. नागरिकांनी या समस्या सोडविण्याची मागणी यावेळी पोलीस आयुक्तांकडे केली. तर ‘सर, या परिस्थितीतून सोडवणूक करा,’ अशी सादही नागरिकांनी घातली.
हे सुद्धा वाचा : पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदु बाबाला अटक; म्हसवड पोलीसांची मोठी कारवाई
पुणे शहरातील वाहतूक सुधारली
देशभरात पुणे वाहतूक कोंडीत चौथ्या स्थानावर असल्याचा दावा ‘टॉमटॉम’ संस्थेने अहवालात केल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजना आणि त्यावर झालेला बदलानुसार शहरातील वाहतूक सुधारली असल्याचा दावा तर केला परंतु, गर्दीत अडकण्याच्या ठिकाणांमध्ये ८ ने घट झाली आहे. त्यासोबतच सोलापूर-पुणे रस्त्यावर वाहन संख्येत वाढ होऊन देखील तेथील कोंडी सुरळीत असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात आणखी आवश्यक त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत होईल, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. परिणामी शहरात पावसाळ्यात देखील यंदा वाहतूक कोंडीच्या नावाने बोंबा-बोंब झाली नाही.
पुणे शहरात मेट्रो, उड्डाणपुल आणि इतर विकासकामे सुरू आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यास सप्टेंबरपासून महापालिका व वाहतूक पोलीस समन्वयातून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करत आहेत. शहरातील ८० टक्के वाहतूक ही प्रमुख ३२ रस्त्यांवरून होते. या प्रमुख रस्त्यांवर सुधारणा करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी करणे यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्यात येत आहेत.