पुणे : वेळेचे उल्लंघन करून डीजेचा मोठा आवाज काढत दणदणाट करणाऱ्या हॉटेल व पबवर कारवाई केली जात असताना डीजेचा आवाज मात्र कमी होत नसल्याचे चित्र असून, १५ दिवसात एकाच हॉटेलवर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे हे पब वाले पोलीस कारवाईला किती महत्त्व देतात असाही प्रश्न आहे. ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन’ हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भादवी कलम २३८, २९०, २९१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अजय राणे यांनी तक्रार दिली आहे.
पुणे पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. तरीही शहरात डीजेचा आवाज वाढवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शहरात हॉटेल-पबमध्ये रात्री आवाज वाढव डीजेवाल्यांचा दणदणाट सुरू आहे. तरुण-तरुणाई या डीजेवर थिरकत पेग रिचवत आहेत. अनेक ठिकाणी बेकायदेशीर हुक्का देखील सुरू असल्याचे पोलिसांच्याच एकाच कारवाईतून समोर आले होते.
दरम्यान अश्या रुफटॉप हॉटेल आणि काही पबविरोधात पुणे पोलिसांच्या ट्विटरवर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे, राजेंद्र कुमावत व त्यांच्या पथकाकडून करावाई करत आहेत.
पोलिसांकडून कारवाई करत गुन्हे दाखल केले जात आहेत. तर डीजे देखील जप्त केला जात आहे. मात्र असे असताना देखील डीजेवाले अन हॉटेलवाले कारवाईला जुमानत नसल्याचे दिसत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अँड किचन या हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यात डीजे जप्त करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देखील या हॉटेलमध्ये वेळेचे उल्लंघन करून डीजेचा मोठा आवाज काढत दणदणाट करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलीस तपासणी मोहीम करत असताना येथे हा प्रकार पुन्हा आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. तर दोन लाख ४० हजार रुपयांचा डीजे जप्त करण्यात आला आहे.