पुणे : कसबा मतदारसंघातील (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीचा निकाल आज (गुरूवारी) जाहीर होत आहे. यापार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी शहराच्या मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यासाठी मनाई केली आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा व चिंचवड पोट निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे. सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या असून, राजकीय वातावरण देखील तितकेच शिगेला गेले आहे. दरम्यान, निकालानंतर संभाव्य अनुचित घटना व कार्यकर्त्यांतील वाद टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियाननगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१ मार्च) पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.
कोरेगाव पार्क येथील गोदामात मतमोजणी होत आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या तसेच पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले. आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह टाकल्या जाणाऱ्या पोस्टवर पोलिसांची नजर राहणार असून, सायबर गुन्हे शाखेचे पथक त्यावर लक्ष ठेवणार आहेत. तर गैरप्रकार व आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.