
Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे काल दु: खद निधन
वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत करण्यात आले अंत्यसंस्कार
पुणे: डॉ. बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते विचार घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले.असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे. यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, माजी आमदार कपिल पाटील,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे,पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Baba Adhav Passed Away: ‘श्रमिकांचं आभाळ फाटलं’; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन
बाबा आढाव यांचे थोरले चिरंजीव असीम आढाव म्हणाले,बाबा म्हणजे एक वादळच होते, जे आज शांत झाले. त्यांच्या कार्याचा व्याप इतका प्रचंड आहे की लाखो लोकांच्या मनात आणि हृदयात त्यांनी घर केले आहे. ते खरे महात्मा होते. त्यांच्या कार्याची मशाल त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांमार्फत आणि विविध संघटनांमार्फत पुढे तेवत राहणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.बाबांची काळजी घेणारे डॉ.अभिजित वैद्य, संपूर्ण मेडिकल टीम आणि कुटुंबीय यांनी दिवस-रात्र सेवा केली, त्यांचे आम्ही आभार मानतो.असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. 📍पुणे pic.twitter.com/yPLcltjdHn — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 9, 2025
बाबांनी आम्हाला मोठे कुटुंब दिले: अंबर आढाव
बाबा आढाव यांचे धाकटे चिरंजीव अंबर आढाव म्हणाले, बाबांचे ९६ वर्षांचे असामान्य आयुष्य अत्यंत लखलखते, तत्त्वनिष्ठ आणि समर्पित असे होते.त्यांचे शरीर थकत होते, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत ते कष्टकरी, असंघटित कामगार यांच्या सन्मान आणि हक्कांच्या कार्यासाठी पूर्णपणे झटत राहिले.बाबांचे शरीर इतके थकलेले होते,तरीही त्यांनी अनेक आंदोलने केली आणि अनेक वेळा जेलमध्ये गेले. बाबांनी आम्हाला इतके मोठे कुटुंब दिले, याबद्दल आम्ही स्वतःला अभिमानी समजतो.अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. बाबा आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव आदी उपस्थित होते.