पुण्यात पावसाचा पहिला बळी, अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
राज्यात मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून २६ मे रोजीच मुंबई पर्यत धडक दिली आहे. अनके जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात नदी नाले भरून वाहात आहेत. धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी धबधबेही प्रवाहीत झाली आहे. दरम्यान पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू असून दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा अंगावर घराची भिंत पडून मृत्यू झाला आहे.
Monsoon Alert: बारामतीत रेकॉर्डब्रेक पाऊस; इंदापूर तालुक्यातील १५० घरांमध्ये पाणी शिरलं
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला दुकानात बसली होती. त्यावेळी दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात उपचार सुरु असताना ताराबाई यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली.
मान्सून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात पाणी साचलं असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईसह पुणे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षा, बचाव आणि मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी सतर्क रहावं आणि सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार यांनी आज पुणे ग्रामीण भागातील गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यातील पावसाचा आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. शेती, पिके, पशुधन आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.