मुंबईतील भुयारी मेट्रो पाण्यात, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Worli Metro Station : महाराष्ट्रात मान्सून वेळेच्या १२ दिवस आधी दाखल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. तर दुसरीकडे मुंबईची भूमिगत मेट्रो लाईन ३ म्हणजेच अॅक्वा लाईन, जी शहराची जीवनरेखा आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जात होती, ती आता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरली आहे. कारण पहिल्याच पावसाने मेट्रोच्या विकासाचं पितळ उघडं पाडल्याचे पाहायला मिळत आहे.मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला फटका बसला असून मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला.
मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला. पावसाळ्याच्यास्थितीसाठी मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोस सुरक्षित आणि निर्धोक बनवण्यात आल्याच्या सर्व दाव्यांची पोलखोल या पावसाने केली आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो तीनचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी सुरु झाल्यानंतर दुसरा टप्पा भाग १ बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
The newly thrown open Mumbai Metro 3! The much hyped underground Metro. The underground station platform is flooded, water can be seen leaking from the roof, water is flowing through the stairs. The Acharya Atre station has been closed, traffic suspended!
Does the Mahabrashth… pic.twitter.com/Tx7lowHaNT
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 26, 2025
मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भींत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि हवामान खात्याने पुढील काही तासांत विशेषतः मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.