
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची....
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या हलक्या पावसाने सोमवारी (ता.7) काहीशी विश्रांती घेतली. दुपारनंतर कडक उन्हाचा सामना करावा लागल्याने उकाड्यात वाढ झाली. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.
शहराच्या काही भागांत सोमवारी सकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. दुपारच्या सुमारास कडक ऊन पडले, तर सायंकाळी आकाश ढगाळ झाले. बदलत्या वातावरणामुळे शहरातील उकाडा वाढला. पुण्यात सोमवारी ३० अंश सेल्सिअस कमाल, तर २०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सध्या मॉन्सूनचे वारे कमकुवत झाले असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही घटले आहे. त्यातच राज्यावर कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही.
Pune Rain : जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा ! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
दरम्यान, ११ ते १२ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा राज्यातील पावसावर नेमका काय परिणाम होईल, याबाबत १० सप्टेंबरनंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तसेच, ‘एल निनो’चा वाढता प्रभाव लक्षात घेता सप्टेंबरमधील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले.
आकाश सामान्यतः ढगाळ राहणार
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता.८) आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.