डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष
आळेफाटा : गणेशोत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा दणदणाट वाढत असतानाच, या डीजे वाहनांच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून जुनाट व वापरातून बाद होण्याच्या स्थितीतील वाहने स्वस्तात खरेदी करून त्यांच्यावर मोठमोठे स्पीकर, जनरेटर आणि लोखंडी सांगाडे बसवून त्यांचा’डीजे वाहन म्हणून वापर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा वाहनांची आरटीओ व वाहतूक पोलिसांनी सखोल तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुने वाहन, नवी सजावट आणि वाढलेले वजन
डीजे वाहन तयार करताना वाहनाच्या मूळ रचनेत बदल केले जात असल्याचे दिसून येते. काही वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपक, जनरेटर, लोखंडी फ्रेम तसेच इतर साहित्य बसवल्याने वाहनाचे वजन आणि आकार वाढतो. अशा बदलांना आवश्यक परवानगी घेतली आहे का, त्यांची आरसीमध्ये नोंद आहे का आणि वाहनाची तांत्रिक तपासणी झाली आहे का? याची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कायदेशीर जबाबदारी कोणाची?
विशेष म्हणजे काही जुन्या वाहनांची नोंदणी मुदत संपलेली असण्याची शक्यता असून, त्यांचा फिटनेस आणि विमा वैध आहे की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सार्वजनिक रस्त्यावर अशा वाहनांचा वापर होत असल्यास एखादी दुर्घटना घडल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
आवश्यक कागदपत्रे तपासण्याची मागणी
मिरवणुकीच्या काळात डीजे वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने संबंधित यंत्रणांनी केवळ ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळी तपासण्यापुरते मर्यादित न राहता वाहनाची संपूर्ण तांत्रिक स्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे. वाहनाचे आरसी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, आवश्यक परवानग्या आणि वाहनाच्या मूळ रचनेत करण्यात आलेले बदल यांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
असुरक्षित वाहने आढळल्यास नियमानुसार कारवाई व्हावी
नियमांचे उल्लंघन करणारी किंवा तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित वाहने आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. उत्सवाचा जल्लोष सुरक्षिततेच्या किमतीवर होऊ नये, यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी डीजे वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






