
विद्यार्थ्यांसाठीची योजना ‘लालपरी’साठी ही फायदेशीर
विद्यार्थी पास आणि अहिल्याबाई होळकर योजनेला उत्तम प्रतिसाद
योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजना आणि विद्यार्थी पास योजना या दोन्ही योजनांना यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत अहिल्याबाई होळकर योजनेत ९०१ विद्यार्थिनींची, तर विद्यार्थी पास योजनेत ८९२ विद्यार्थ्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत एसटी पास दिला जातो. तर विद्यार्थी पास योजनेंतर्गत सवलतीच्या दरात एसटी महामंडळाकडून पास उपलब्ध करून दिले जातात. या दोन्ही योजनेला शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यंदा चांगला प्रतिसाद दिला आहे.अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत २०२४ मध्ये १,८५९ विद्यार्थिनींनी लाभ घेतला होता, तर २०२५ मध्ये २,७६० विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे यंदा तुलनात्मकदृष्ट्या ९०१ विद्यार्थिनींची वाढ झाली आहे.
विद्यार्थी पास योजनेत विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एकूण किंमतीच्या केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास घेता येतो. २०२४ मध्ये ९,३२७ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता, तर २०२५ मध्ये १०,२१९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये ८९२ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
‘लालपरी’ला आले सोन्याचे दिवस! सहलीच्या हंगामाने ST ला फायदा; महामंडळाला 10 कोटी…
अहिल्याबाई होळकर योजनेतून पुणे एसटी विभागाला यंदा १ कोटी ६० लाख ४२ हजार रुपये इतके उत्पन्न महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. तर विद्यार्थी पास योजनेंतर्गत आतापर्यंत ४४ लाख ७९ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले असून ८९ लाख ५९ हजार रुपये उत्पन्न मिळणे बाकी आहे. एकूण मिळून १ कोटी ३४ लाख ३८ हजार ७०४ रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
विद्यार्थी पास
विद्यार्थ्यांना एकूण किंमतीच्या केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास घेता येतो.
अहिल्याबाई होळकर योजना
ही योजना केवळ शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी लागू आहे.
इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभासाठी मुलींना ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
‘लालपरी’च्या थांब्याचे वाजले तीनतेरा! निधीअभावी बसस्टँडचे काम ठप्प; प्रवाशांचा संताप
मुलींसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजना तसेच विद्यार्थी पास योजनांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
— अरुण सिया,
विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग