
पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; 'या' मुद्द्यांवरच होणार लढत
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडे मैदानात उतरले होते. त्यांना सुमारे ४८ हजार मते मिळाली असली, तरी ती ताकद जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पुरंदर तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद गट आहेत—दिवे-गराडे, नीरा-कोळविहिरे, बेलसर-माळशिरस आणि वीर-भिवडी. यापैकी दिवे-गराडे गट शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती राजाराम झेंडे यांनी केलेल्या विकासकामांचा ठसा आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यामुळे शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे बोलले जाते. येथे तिहेरी लढत असली, तरी शिवसेनेकडे माप झुकल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
वीर-भिवडी गटातही चुरस कमालीची आहे. हा गट विजय शिवतारे यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी त्यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ लोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतल्याने लढत रंगतदार बनली आहे. त्यामुळे या गटात शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
सामना लक्षवेधी ठरणार
बेलसर-माळशिरस गटात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष अपेक्षित आहे. तर नीरा-कोळविहिरे गटात पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या आणि माजी सभापती अतुल मस्के यांच्या पत्नी यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीत केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. पाणीटंचाई, प्रस्तावित विमानतळ, दुष्काळी परिस्थिती, गुंजवणी प्रकल्प, मेट्रोचा विस्तार, रस्त्यांची दुरवस्था, विविध पाणी योजना आणि पुरंदर उपसा यांसारख्या प्रश्नांवर मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक ही व्यक्ती, पक्ष आणि विकासाच्या मुद्द्यांवरच लढली जाणार असून, पुरंदरमध्ये कोणाचा बालेकिल्ला अबाधित राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.