
दोन सख्ख्या बहिणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, अचानक बिबट्याने झडप घातली अन्...; ओतूरमधील धक्कादायक घटना
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचा हैदोस सुरूच असून, गुरुवारी सकाळी वाघचौरे वस्ती परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. मात्र, १३ वर्षांच्या कल्याणीने दाखवलेले अजोड धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे तिची १० वर्षांची लहान बहीण काव्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावली. या हल्ल्यात काव्या गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ओतूर परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, वनविभागाच्या कारभारावर आणि स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर गावच्या हद्दीतील वाघचौरे वस्ती येथे राहणारी काव्या महेंद्र वाघचौरे (वय १०) आणि तिची मोठी बहीण कल्याणी महेंद्र वाघचौरे (वय १३) या दोन्ही बहिणी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरापासून पुढील गोटीशिवार-मांदरणे मार्गावर मॉर्निंग वॉक करत होत्या. त्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक काव्यावर झडप घातली. बिबट्याने काव्याला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पाठीवर दोन ते तीन मोठे ओरखडे ओढून गंभीर जखमा केल्या.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही बहिणी सुरुवातीला प्रचंड गोंधळल्या आणि भयभीत झाल्या. परंतु, अवघ्या १३ वर्षांच्या कल्याणीने आपला संयम गमावला नाही. लहान बहिणीचे प्राण धोक्यात आलेले पाहून कल्याणीने थेट बिबट्याशी दोन हात करण्याचे धाडस दाखवले. तिने जीवाची पर्वा न करता बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी त्याच्या रोखाने धाव घेतली आणि जागेवरच मोठा आरडाओरडा सुरू केला. कल्याणीचा हा आक्रमक पैलू आणि प्रतिहल्ला पाहून बिबट्याही काही काळ बिथरला आणि काव्याला सोडून त्याने शेतात धूम ठोकली. कल्याणीच्या या प्रसंगावधानामुळे काव्याचे प्राण थोडक्यात वाचले.
बहिणींचा आवाज ऐकून काव्याचे वडील महेंद्र वाघचौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले आणि इतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताळलेल्या अवस्थेतील काव्याला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे आणि डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी काव्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि पुढील वैद्यकीय गुंतागुंत टाळण्यासाठी तिला पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
“माझ्या मुलीचे दैव बलवत्तर होते म्हणून तिचे प्राण वाचले. कल्याणीने धाडस दाखवले नसते तर आज अनर्थ घडला असता. पण ओतूरला एवढे मोठे ग्रामीण रुग्णालय असूनही जर माझ्या जखमी मुलीला उपचारासाठी नारायणगाव किंवा पुण्याला घेऊन जावे लागत असेल, तर ही राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्थेसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. येथे तातडीने तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफ नेमून बिबट हल्ले किंवा अपघातातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळायला हवेत. वनविभागाने येथे त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.” — महेंद्र वाघचौरे (जखमी मुलीचे वडील व स्थानिक ग्रामस्थ).
ओतूर ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेवर संताप
या घटनेनंतर ओतूरमधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे पुन्हा एकदा वेशीवर टांगले गेले आहेत. नुकतेच ओतूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून भव्य ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे, मात्र येथे अजूनही पुरेशा सुविधा आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. एका गंभीर बिबट हल्ल्यातील बालकाला प्राथमिक उपचारानंतर थेट नारायणगाव किंवा पुण्याचा रस्ता धरावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
”ओतूर आणि जुन्नरचा हा परिसर बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अशा संवेदनशील भागात राहूनही वनविभाग केवळ घटना घडल्यानंतर जागे होतो. या भागात बिबट्यांचा वावर प्रचंड वाढला असून वनविभागाने तत्परतेने पावले उचलणे गरजेचे आहे. गोटीशिवार-मांदरणे मार्गावर आणि वाघचौरे वस्ती परिसरात तात्काळ पिंजरा लावण्यात यावा, अन्यथा वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” — मोहित ढमाले (माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते).
या थरारक घटनेमुळे ओतूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला आणि शेतमजूर आता शेतात जाण्यासही धजावत नाहीत. वनविभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करून या नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आता संपूर्ण जुन्नर तालुक्यातून होत आहे.
”घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. ज्या भागात हा हल्ला झाला, त्या परिसरात तात्काळ गस्त वाढवण्यात येत असून, वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीने तिथे पिंजरा लावण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल. ग्रामस्थांनी शेतात किंवा सकाळी फिरताना काळजी घ्यावी आणि एकटे जाणे टाळावे. जखमी मुलीच्या कुटुंबाला वनविभागाच्या नियमानुसार योग्य ती वैद्यकीय मदत त्वरित मिळवून दिली जाईल.” — तेजस कांबळे वनपरीक्षेत्र अधिकारी (ओतूर वनविभाग)
हे सुद्धा वाचा : बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी