बाललसीकरणात पुणे आघाडीवर (फोटो- istockphoto)
आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला यश
बाल लसीकरण प्रकारांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक कामगिरी
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ६३ हजार ५६५ बालकांच्या जन्माची नोंद
सुनयना सोनवणे /पुणे: बालमृत्यू रोखणे, संसर्गजन्य आजारांवर (Health) नियंत्रण मिळवणे आणि एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला पुणे शहरात मोठे यश मिळाले आहे. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अंतिम अहवालानुसार एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत शहरातील बहुतांश बाल लसीकरण प्रकारांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक कामगिरी नोंदविण्यात आली आहे.
अहवालानुसार या कालावधीत शहरात एकूण ६३ हजार ५६५ बालकांच्या जन्मांची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक उद्दिष्टाच्या १०२ टक्के आहे. जन्मानंतर बालकांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, व्हिटॅमिन-के, हेपेटायटिस-बी आणि ओपीव्ही लसीकरणात १०१ ते १०७ टक्क्यांपर्यंत उद्दिष्टपूर्ती झाली आहे. तसेच पेंटाव्हॅलेंट, ओपीव्ही, आयपीव्ही आणि रोटाव्हायरस लसीकरणात १०६ टक्के कामगिरी नोंदविण्यात आली आहे.
शहरातील ९ ते ११ महिन्यांच्या बालकांसाठी राबविण्यात आलेल्या गोवर-रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेत १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, पीसीव्ही बूस्टरमध्येही १०७ टक्के कामगिरी नोंदवली गेली आहे. तसेच १६ ते २४ महिन्यांतील बालकांसाठीच्या गोवर-रुबेलाची दुसरी मात्रा, डीपीटी बूस्टर आणि ओपीव्ही बूस्टरमध्ये १०८ टक्के कामगिरी झाली आहे.
आरोग्य विभागाने घरभेटी, स्थलांतरित व झोपडपट्टी भागातील बालकांचा शोध, तसेच जनजागृती मोहिमांवर विशेष भर दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचाही मोठा वाटा राहिला.
दरम्यान, बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर विशेष लसीकरण कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कृती दल लसीकरण मोहिमांचा नियमित आढावा घेणार असून, त्रुटी दूर करणे, निधी वापरावर लक्ष ठेवणे आणि वंचित बालकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यावर भर देणार आहे.
एकूण जन्म नोंद : ६३,५६५
उद्दिष्टपूर्ती : १०२ टक्के
बीसीजी ते ओपीव्ही : १०१-१०७%
पेंटाव्हॅलेंट व रोटाव्हायरस : १०६%
एमआर लसीकरण : १०७%
पीसीव्ही बूस्टर : १०७%
डीपीटी/ओपीव्ही बूस्टर : १०८%
पूर्ण लसीकरण झालेले मुलगे : ३४,६५८
पूर्ण लसीकरण झालेल्या मुली : ३२,५०१






