
पुणे/सुनयना सोनवणे: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील बदलत्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासोबत (सीआयएसएफ) आयोजित करण्यात आलेले दोन आठवड्यांचे संयुक्त प्रशिक्षण नुकतेच पुण्यात यशस्वीरीत्या पार पडले.
‘लष्करी-नागरी समन्वय’ (मिलिटरी-सिव्हिल फ्युजन) या संकल्पनेअंतर्गत औंध येथील लष्करी-नागरी समन्वय तळावर या विशेष सरावाचे आयोजन करण्यात आले होते. शहरी भागातील दहशतवादविरोधी कारवाया, अंतर्गत सुरक्षा परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता आणि आपत्कालीन परिस्थितीत संयुक्तपणे काम करण्याची तयारी वाढविण्यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.
या सरावात सीआयएसएफचे १०२ अधिकारी व जवान सहभागी झाले होते. त्यामध्ये १० महिला जवानांचाही समावेश होता. भारतीय लष्कराच्या जवानांसोबत प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित युद्धसदृश प्रशिक्षण, संशयित ठिकाणांवरील कारवाया, शोध व बचाव मोहीम, तातडीचा प्रतिसाद आणि सामरिक कार्यपद्धतींचा सखोल सराव करण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान कृत्रिमरीत्या वास्तववादी परिस्थिती निर्माण करून संयुक्त पथकांच्या प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यात आली. तसेच आधुनिक दहशतवादी धोके, संवेदनशील आस्थापनांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, माहितीची देवाणघेवाण आणि बदलत्या सुरक्षा आव्हानांवरही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संयुक्त प्रशिक्षणामुळे भारतीय लष्कर आणि सीआयएसएफ यांच्यातील समन्वय व परस्पर विश्वास अधिक दृढ झाला आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या सुरक्षा आव्हानांना प्रभावी आणि एकात्मिक पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी अशा संयुक्त प्रशिक्षणांचा मोठा फायदा होणार असून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्करी व नागरी सुरक्षा दलांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी भारतीय लष्कर कटिबद्ध आहे.
भारतीय सैन्यात परीक्षा न देता थेट अधिकारी बनण्याची संधी
भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची तयारी करणाऱ्या एनसीसी कॅडेट्ससाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय लढाऊ दलाने ‘एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम १२५ व्या कोर्स’ अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी केली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ अंतर्गत लेफ्टनंट पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे. ही भरती नेहमीच्या भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे, कारण यामध्ये केवळ एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र धारक पात्र उमेदवारच अर्ज करू शकतात. एनसीसी दरम्यान मिळालेले लष्करी प्रशिक्षण, शिस्त आणि नेतृत्व कौशल्य लक्षात घेऊन भारतीय सेना या उमेदवारांना अधिकारी बनण्याची विशेष संधी देते.