
म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे. कागदपत्रांच्या ऑनलाईन पडताळणी प्रक्रियेत अर्जदारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अर्ज सादर करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर झालेली सोडतीची तारीखही पुढे ढकलण्यात आली असून, आता २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन कागदपत्र पडताळणीदरम्यान अर्जदारांना अडचणी येत असल्याने मुदतीत एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे.
पुणे-पिंपरीत 2874 सदनिका
या सोडतीत एकूण ४ हजार ४६२ सदनिका उपलब्ध आहेत. त्यापैकी २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २ हजार ९७१, तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत १ हजार ४९१ सदनिकांचा समावेश आहे. पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १ हजार ४०६, तर पीएमआरडीए क्षेत्रात १ हजार ५८८ सदनिका उपलब्ध आहेत. मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ सदनिकांचाही या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
अर्जापासून सोडतीपर्यंतचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी त्याच दिवशी रात्री ११.५९ वाजेपर्यंत, तर आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे रक्कम भरण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दावे-हरकती नोंदविता येतील. अंतिम यादी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
उत्पन्न दाखल्यासाठी दोन वर्षांची मुभा
अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. यानंतर २६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता सोडत काढली जाईल. सोडतीतील यशस्वी अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत.
डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष