
बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
Baramati News : शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचं सर्वात मोठं साधन असून शिक्षक हे राष्ट्राची खरी संपत्ती आहेत, असं सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या शिक्षण क्षेत्रासाठी मोठी ग्वाही दिली. बारामती तालुक्यातील शाळांचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंचायत समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील, किरण तावरे, शुभांगी आगवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांनी शिक्षकांच्या भूमिकेवरही जोर दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातलं ज्ञान देऊन थांबू नये, तर त्यांच्यात सत्यनिष्ठा, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करावा, असं त्यांनी सांगितलं. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी यावर्षी 600 शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. प्रत्येक शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
बारामती तालुक्यात सध्या 65 जिल्हा परिषद शाळांमध्ये 11 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये सुरू असलेली मॉडेल स्कूलची कामं, शिक्षक भरती आणि ‘मिशन 300’ अंतर्गत होणाऱ्या कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
ग्रामीण भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी वाचन करावं, प्रश्न विचारावेत, स्वतःचं मत तयार करावं आणि अपयशाला घाबरू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षक प्रशिक्षण, विज्ञानविषयक उपक्रम, डिजिटल शिक्षण, समूह शाळा, आदर्श शाळा आणि ‘निपुण महाराष्ट्र’ यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.