संग्रहित फोटो
महानगरपालिका निवडणुकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्याच आत्मविश्वासावर जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर प्रचाराची धार काहीशी बोथट झाल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्या पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापून नव्या चेहऱ्यांवर भर दिला आहे. शिवसेनेनेही जुन्नर, आंबेगाव आणि खेडमध्ये ताकद वाढवत निवडणुकीला रंगत आणली होती; पण शोकाकुल वातावरणामुळे प्रचाराची रणधुमाळी तात्पुरती थंडावली आहे.
भोर तालुक्यात राष्ट्रवादीतून बंडखोरी उफाळून आली आहे. माजी सदस्यांची तिकिटे कापल्याने त्यांनी अपक्ष किंवा अन्य पक्षांचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी भाजपमध्येही काही ठिकाणी अंतर्गत नाराजी दिसून येते. राजगड आणि दौंड तालुक्यांत राष्ट्रवादी-भाजप अशी सरळ लढत होत असून, शिरूरमध्ये उमेदवारीवरून बंडखोरीचे सूर उमटले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवत असल्याने काही इच्छुकांनी शिवसेना व इतर पक्षांकडे मोर्चा वळवला आहे.
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी कुटुंबांतर्गत आणि भावकीतील थेट लढती. भोर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड, इंदापूर तसेच मुळशी-हिंजवडी परिसरात नातेसंबंधातील उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर वैयक्तिक प्रतिष्ठेचीही बनली आहे.
मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात पक्षांना अपयश आले असून, त्याचा थेट परिणाम निकालांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शोकाच्या वातावरणात होत असलेली ही निवडणूक पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






