
सुपर संडे ठरला ‘हाय व्होल्टेज’, पुण्यात जोरदार प्रचार; उद्या प्रचाराची अधिकृत सांगता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ,पुण्याच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी भाजप पुणे शहरतर्फे ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी पुणेकरांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक पुणेकरांच्या वतीने फडणवीस यांच्याशी संवाद साधला. हा कार्यक्रम शहरातील सर्व प्रभागांमध्ये ‘लाईव्ह स्क्रीन’द्वारे दाखवल्या मुळे प्रचाराला वेगळाच रंग चढला.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. रविवारी विविध प्रभागांमध्ये त्यांच्या प्रचार रॅली आणि सभा पार पडल्या, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराची रंगत आणखी वाढली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
वैयक्तिक भेटींवर भर
भाजपकडून खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार प्रचारात उतरले आहेत. तर उमेदवारांनीही वैयक्तिक भेटीगाठींवर विशेष भर दिला आहे. रविवार असल्याने सकाळी पदयात्रा, दुपारी घरभेटी व कोपरा बैठका आणि सायंकाळी जाहीर सभा व रॅलींचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
उमेदवारांमध्ये तणाव
प्रचार संपल्यानंतर आचारसंहिता अधिक कडक होणार असल्याने उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अखेरचा रविवार मतदारांच्या मनावर किती प्रभाव टाकतो, यावरच निवडणुकीचा निकाल ठरणार असल्याने ‘सुपर संडे’च निर्णायक ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.