
चाकणमध्ये श्रद्धांजली पदयात्रा अन् शोकसभा; हजारोंच्या उपस्थितीत अजित पवारांना आदरांजली
ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत बसस्थानक परिसरात पोहोचली. तेथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत नागरिकांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. शोकसभेत बोलताना विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांनी अजित पवार यांचे खेड तालुक्यावर असलेले विशेष प्रेम आणि त्यांचे विकासात्मक योगदान अधोरेखित केले. खेड तालुक्यातील औद्योगिक विकास, चाकण औद्योगिक वसाहतीचा विस्तार, रोजगारनिर्मिती, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे मान्यवरांनी सांगितले.
चाकण शहरातील सध्या सुरू असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे अजित पवार यांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पहाटेच प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. अजित पवार हे पक्षभेद न करता सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी व उद्योजकांच्या समस्या ऐकून घेणारे नेतृत्व होते. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्यांच्या प्रश्नाला ते त्वरित प्रतिसाद देत असल्याचे अनेकांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच “चाकण गावचे पालकत्व हरपले” अशी भावना शोकसभेत वारंवार व्यक्त होत होती.
शोकसभेनंतर अजित पवार यांना अखेरची आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र आला होता. परिसरात शोकाकुल वातावरण होते. तर अजितदादा अमर रहें” अशा भावना व्यक्त केल्या जात होत्या. अजित पवार यांच्या निधनाने एक धडाडीचे, निर्णयक्षम व विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना चाकण शहरासह संपूर्ण खेड तालुक्यात व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याची आठवण जनतेच्या मनात कायम राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.