सौजन्य - नवराष्ट्र टीम
शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील अजित पवारांशी असलेल्या सुमारे २७ वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा देताना सांगितले की, “मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९९८ साली ‘खेड वार्ता’ नावाचे मासिक सुरू केले होते. त्या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी अजितदादा स्वतः माझ्या वराळे गावी आले होते. माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांनी त्यांना आणले होते. त्यावेळी दादा आमदार तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते.”
त्या काळातील आठवणी सांगताना ते म्हणाले, “त्यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था अत्यंत साधी होती, माणसेही कमी होती. तरीसुद्धा अजितदादांनी माझे संपूर्ण भाषण शांतपणे ऐकले आणि कार्यक्रमाला पूर्ण वेळ दिला. हीच माझी आणि दादांची पहिली भेट. दादा तेव्हा अत्यंत सडपातळ होते, टाटा इस्टेट गाडीतून आले होते; मात्र त्यांचा स्पष्टपणा आणि शिस्त तेव्हापासूनच जाणवली.”
चाकण व खेड तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना बुट्टे पाटील म्हणाले, “त्या काळात चाकणमध्ये एमआयडीसी नव्हती. गर्दी नव्हती. परिसर मागास होता. तरीसुद्धा दादांनी माझ्या सर्व महाविद्यालयीन मित्रांसोबत फोटो काढले. छोट्या कार्यकर्त्यालाही तेवढ्याच आपुलकीने वागवणारे दादा जेवढे कडक, तेवढेच प्रेमळ होते.”
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच अजितदादांनी मला युवक तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देत कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपदही सोपवले, हे त्यांच्या विश्वासाचे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भावनिक प्रसंग सांगताना ते म्हणाले, २४ मे २००२ रोजी माझे लग्न होते. मी देवगिरी बंगल्यावर मुंबईला पत्रिका द्यायला गेलो; मात्र दादा परदेशात होते. मी पत्रिकेच्या मागे फक्त एवढेच लिहिले होते की, ‘दादा, माझे स्वतःचे लग्न आहे, तुम्ही आलात तर खूप आनंद होईल.’ दादा येतील अशी अपेक्षाही नव्हती; पण मिरवणुकीत असतानाच निरोप आला की दादा लग्नाला येत आहेत. आणि ते तब्बल एक तास आधी लग्नस्थळी आले.
ते पुढे म्हणाले, गेली २७ वर्षे आमचे संबंध प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे राहिले. मी पक्ष सोडताना देखील दादांनी मला शांतपणे बोलण्यासाठी भरपूर वेळ दिला. पक्ष सोडल्यानंतरही त्यांनी कधी दुरावा निर्माण केला नाही, उलट नेहमी आपुलकीनेच वागवले.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या भेटीचा उल्लेख करताना बुट्टे पाटील म्हणाले, तब्बल ४८ मिनिटे त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी विविध विषयांवर चर्चा केली. माझ्या राजकीय वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावर त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. आज अशा नेतृत्वाचा अंत झाला असला, तरी त्यांनी दिलेली शिकवण, विश्वास आणि माणुसकीची वागणूक आयुष्यभर मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.






