
सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत
पुणे : चाकण शहर आणि परिसरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत खेड तालुक्यात 81.3 मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चाकण शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डबकी तयार झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, पुणे-नाशिक महामार्ग, म्हाळुंगे चौक तसेच परिसरातील इतर प्रमुख मार्गांवर दिवसभर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. कार्यालयीन तसेच कंपन्यांच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठा विलंब होत आहे. तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर काही ठिकाणी काम सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी बगायला मिळत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असले तरी सततधार पावसामुळे परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे.
त्याबरोबर पावसाचा सर्वाधिक परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. बाजारात भाजीपाला आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी टोमॅटो, कोथिंबीर, पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी, भेंडी, मिरची यांसह विविध भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक दर मोजावे लागत असून सर्वसामान्य गृहिणींचे घरगुती अर्थकारण विस्कळीत झाले आहे.
चाकण परिसरातील नदी, नाले आणि ओढ्यांमध्ये पाण्याची वाढ झपाट्याने वाढत आहे.पुढील तीन दिवस जर पाऊस असाच सुरु राहिल्यास नदी तसेच ओढ्याच्या पाणी पात्रात वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शेतातील पिकांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नगर परिषद प्रशासन सतर्क असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून आणि नदी-नाल्यांमधून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगर परिषद किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा.
पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनासह नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी सतर्कता आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.