संग्रहित फोटो
वडगाव मावळ : एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी शंकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. तसेच, मावळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी आकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांची सांगली जिल्ह्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कामशेत येथील पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कामशेत पोलीस स्टेशनच्या रिक्त पदावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून आकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी केल्या आहेत.
नवीन नियुक्त अधिकाऱ्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या बदली व नियुक्त्यांमुळे वडगाव मावळ आणि कामशेत परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा आणि नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद यावर भर देण्याचे संकेत दिले आहेत.
मावळ तालुका पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर नवीन अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तसेच, स्थानिक नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे आणि पोलिस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ करून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, बदली झालेले पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मेट्रो लाईनच्या बोगद्याला छिद्र ! घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार






