सतेज पाटलांचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आठवड्यातून एक तरी...
पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहण्यासाठी सक्रीय रहा, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.
खडकवासला येथे पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना सतेज ऊर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले की, आपल्या भागातील जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली पाहिजेत. आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे. १८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेससोबत जोडला गेला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा व त्यादृष्टीने वाटचाल करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका
काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत असून ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला, असा घणाघाती हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.