
फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा...; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा
फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. प्रशासनाकडून कारवाई केली जाते, मात्र काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणे वाढत असल्याचे साळेगावकर यांनी सांगितले. आमदार आणि सर्व नगरसेवक या प्रश्नावर आग्रही असतानाही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतिक्रमणांवर वारंवार कारवाई करूनही ती पुन्हा कशी वाढतात? यामागे खालच्या स्तरापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत काही हप्ते सुरू आहेत का, अशी शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एका व्हिडिओद्वारे अधिकाऱ्यांना थेट इशारा देताना साळेगावकर म्हणाले की, येणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त केला नाही, तर सभेच्या पहिल्याच दिवशी खाली मांडी घालून बसणार आहे. तसेच हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्याला वाचा फोडल्याशिवाय थांबणार नाही.
फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. आगामी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा कोणते वळण घेतो आणि प्रशासन त्यावर काय भूमिका घेते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Ans: भाजपचे पुणे शहर सरचिटणीस तथा नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.
Ans: आगामी जनरल बॉडी मीटिंगपर्यंत फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त न झाल्यास सभेच्या पहिल्याच दिवशी मांडी घालून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ans: फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणांमुळे नागरिक, विद्यार्थी, पादचारी आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.