पुण्यात पोलिस आयुक्तांच्या बंगल्यात कर्मचारी शिरला मद्यधुंद अवस्थेत; राडा घातला अन् आयुक्तांनाच म्हणाला... (संग्रहित फोटो)
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या राहत असलेल्या शासकीय बंगल्यात मंगळवारी रात्री एका पोलिस कर्मचाऱ्याने ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ घडवला. हा कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. त्या अवस्थेत तो चारचाकी घेऊन बंगल्यात शिरला आणि अर्धा तास पुढे ड्रामा सुरू राहिला. आयुक्तांनी त्याची बदली पोलिस मुख्यालयात केल्याने हा असमाधानी कर्मचारी थेट गाडी घेऊन गेल्याचे समोर आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
शहर पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच अशी धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमोल वसंतराव भिसे (वय ४२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल भिसे याच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व बंडगार्डन पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल भिसे सध्या पोलिस मुख्यालयात नेमणुकीला आहे. पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबन संपल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. त्याला मंगळवारी पोलिस मुख्यालय येथे नेमणूक देण्यात आली होती. त्याला पोलिस आयुक्तांच्या बंगल्यातून पोलिस ठाण्यात आणि पोलिस ठाण्यातून ससून रुग्णालयात मेडिकलसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी देखील त्यांनी मोठा गोंधळ घातला.
पोलिस आयुक्तांनाच म्हणाला…
गेटच्या दारावर सुरू असलेला गोंधळ ऐकून पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः बाहेर आले. आयुक्त दिसताच अमोल गारद झाला अन् गाडीतून खाली उतरला. त्याने आयुक्तांना तुम्हीच माझे ‘गॉडफादर’ आहात असे म्हणत बदलीबाबत बोलणे सुरू केले. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
मानसिक स्थिती बिघडली
अमोल भिसे याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पोलीस मुख्यालयात सध्या नेमणूक आहे. दारुच्या नशेत तो कार घेऊन आला होता. त्याने कार मुख्य गेटला धडकवली. त्यात गेटचे नुकसान झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
FAQ
१. पुण्यात नेमकी कोणती घटना घडली?
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय बंगल्यात एका मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्याने गोंधळ घातला.
२. ही घटना कधी घडली?
मंगळवारी रात्री ही घटना घडली.
३. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव काय आहे?
अमोल वसंतराव भिसे (वय ४२) असे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.






