पुणे: पुढील पाच दिवसांत वडगाव शेरी परिसरातील पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिली. पुणे विमानतळ येथे महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वडगाव शेरी परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विमानतळावर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या वेळी पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली. परिसरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश त्यांनी या वेळी महापालिकेच्या अधिकार्यांना दिले. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी उपस्थित होते.
महिलांनी उपोषण घेतले मागे
वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच महिलांनी उपोषण केले होते. या वेळी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी दूरध्वनीवरून अजित पवार यांच्याशी संपर्क साधून परिसरातील पाणीप्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली होती. या वेळी अजित पवार यांनी पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महिलांनी आपले उपोषण मागे घेतले होते.
वडगाव शेरी परिसरात गेल्या पाच वर्षांत कधीही पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला नाही. महापलिकेचे अधिकारी आणि टँकरमाफिया संगनमताने या भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत आहेत. आयुक्तांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– सुनील टिंगरे, माजी आमदार
अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे, मात्र हा अहवाल खोटा असून नागरिकांना पाण्याची समस्याच ही भेडसावतच आहे. असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.
Pune Water News: पुण्यातील ‘या’ भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी चंदन नगर भागातील पाण्याच्या टाकीसमोर सामाजिक कार्यकर्ते संकेत गलांडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी या भागातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारात नळ आहे तसेच उशाला पाण्याच्या तीन टाक्या आहेत. तरी सुध्दा घशाला कोरड आहे. असे सांगून नेमके वडगाव शेरीच्या वाट्याचे पाणी कुठे मुरते आहे. असा प्रश्न उपस्थित करुन महापालिकेच्या विरोधात महिलांनी रोष व्यक्त केला.