पुण्यात निर्माण झाली पाण्याची समस्या (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
पुणे: वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे, मात्र हा अहवाल खोटा असून नागरिकांना पाण्याची समस्याच ही भेडसावतच आहे. असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी चंदन नगर भागातील पाण्याच्या टाकीसमोर सामाजिक कार्यकर्ते संकेत गलांडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी या भागातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारात नळ आहे तसेच उशाला पाण्याच्या तीन टाक्या आहेत. तरी सुध्दा घशाला कोरड आहे. असे सांगून नेमके वडगाव शेरीच्या वाट्याचे पाणी कुठे मुरते आहे. असा प्रश्न उपस्थित करुन महापालिकेच्या विरोधात महिलांनी रोष व्यक्त केला.
महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा
पठारे म्हणाले की, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वडगाव शेरीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याचे राजकारण केले जात आहे. महापालिकेकडून पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नागरिकांपर्यंत पाणीच पोहचत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा विनंती अर्ज करुन झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिल्यांनतर अहवाल सादर करुन त्यांचीही दिशाभूल केली आहे. अद्याप पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस जलवाहिनीतून इतर भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची चोरी होत आहे. एक्सप्रेसला जलवाहिनी जोडता येत नाही. त्यामुळे ती बंद करुन वडगाव शेरीकरांना पाण्याचा पुरवठा सुरळीत करता येईल. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
घोरपडीतील व्हॉलमनची मनमर्जी
वडगावशेरी, खराडीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे मुळ कारण समोर आले आहे. लष्कर जलकेंद्रातून ७० एमएलडी पाण्याचा पुरवठा खराडी, वडगावशेरीला केला जातो. ताडीगुत्ता आणि घोरपडी येथील जलवाहिन्यांसाठी वॉल बसविण्यात आला आहे. ही जलवाहिनी एक्सप्रेस जलवाहिनी आहे. या वाहिनीला कायद्यानुसार जोड देवून इतर भागाला पाणी देता येत नाही. परंतु काही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदा जलवाहिनीला जोड देवून या भागासाठी जलवाहिनी जोडण्यात आली आहे. या भागाला दीड लाख लिटर पाणी दिले जाते. त्यानंतर वडगावशेरीला नियमानुसार पाणी मिळायला हवे. परंतु या भागातील व्हॉलमन परस्पर हा वॉल फिरवून पाणी वळवून एकप्रकारे चोरी करतात. घोरपडीतील व्हॉलमन त्यांची मनमर्जी करत आहेत. रात्री अपरात्री व्हॉल फिरवत आहेत. त्यामुळे वडगाव शेरी, खराडीतील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी या भागाला पाणी मिळत नाही. असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.