सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था व सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यापूर्वी गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेपातून ते मागे घेतले जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचे धाडस केले जाते, असा आरोपही त्यांनी केला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत शहरातून पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असतील. तसेच पोलिस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनीही या उल्लंघनांच्या नोंदी घेतल्या असल्याचे वेलणकर यांनी पत्रात नमूद केले आहे. या सर्व नोंदींच्या आधारे संबंधित मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली. दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत महिनाभरात न्यायालयात खटले दाखल करणे आवश्यक आहे.
मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी जागेवर कारवाई करणे टाळले असेल, हे समजण्यासारखे आहे. मात्र, आता तातडीने कायदेशीर कारवाई न केल्यास दरवर्षी ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत जातील. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन वेलणकर यांनी पोलिस आयुक्तांना केले आहे.
मिरवणुकीत दणदणाट
विसर्जन मिरवणुकीत प्रचंड दणदणात झाला. त्यामुळे लोक हैराण झाले होते. ध्वनी प्रदुषणात कोणतीही कमतरता जाणवली नाही. मध्यवर्ती नारायण पेठेत सर्वाधिक ध्वनी प्रदूषण कळसाला पोहोचले होते. माझ्या आंदोलनाचे यश आले नाही, प्रामुख्याने काही मंडळांनी माझे आर्टिंफिशल इंटेलिजन्स व्हिडिओ बनवून, मी बोललेले दाखवून नाचवत होते. ३६५ दिवस शांतता हवी असून, त्यासाठी माझे कार्य सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ध्वनी प्रदुषणविरोधात लढणारे विद्यानंद बापट यांनी दिली आहे. पोलिसांनी ऑन द स्पॉट कारवाई करायला पाहिजे होती. डेसीबलविरुद्ध कारवाईची इच्छा होती तर का केली नाही. ती पुढे काही दिवसांत करावी, अशीही मागणी बापट यांनी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये ९१ मंडळांवर गुन्हे
गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ ते २६ सप्टेंबर 2026 या कालावधीत शहरात ध्वनीप्रदूषणासंदर्भात एकूण ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परिमंडळ १ मध्ये सर्वाधिक २९ गुन्हे दाखल झाले आहेत. परिमंडळ २ मध्ये ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ ३ मध्ये ८ गुन्हे दाखल आहेत. तर परिमंडळ ४ मध्ये १० गुन्हे दाखल झाले आहेत. परिमंडळनिहाय कारवाईमध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, दापोडी, बावधन, काळेवाडी, हिंजवडी, वाकड, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि शिरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे.






