बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच; नाहीतर थेट कारवाई होणार
पुणे : पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. पावसाने दिलेली ओढ आणि खडकवासला धरणसाखळीतील मर्यादीत पाणीसाठा या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पाणी कपात सुरु आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकामांना थेट कामबंदची नोटीस देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील धरणातील पाणीसाठा मर्यादित आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांवर या तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीदरम्यान कोणत्याही बांधकामस्थळी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित बांधकामाला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कामबंदची नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाईची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण
शहरातील वाढती लोकसंख्या, उष्णतेची तीव्रता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. उपलब्ध जलसाठ्याचा प्राधान्याने पिण्यासाठी वापर होणे आवश्यक असल्याने इतर कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास महापालिकेने आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी तसेच व्यावसायिक आस्थापनांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वॉशिंग सेंटरवरही प्रशासनाचे लक्ष
बांधकामांपुरतीच कारवाई मर्यादित राहणार नसून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या इतर घटकांवरही महापालिका लक्ष ठेवून आहे. शहरातील वॉशिंग सेंटर, वाहन धुण्याची केंद्रे तसेच विनाकारण पाणी वाया घालविणाऱ्या ठिकाणांची तपासणी सुरू असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे
पाणीटंचाईच्या काळात प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि महापालिकेच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर अभियंता पावसकर यांनी केले.






