
थंडीत तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्याच; बाहेर जाणं टाळा
पुणे : सध्या वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनते. प्रौढांवर उपचार करणे सोपे असते. मात्र, लहान मुलांची काळजी काय घ्यावी हे अनेकांना समजत नाही. पण आता थंडीत लहान मुलांची काळजी घेताना बाहेर जाणे टाळावे. मास्कचा वापर करण्याचा सल्ला मंगलमूर्ती क्लिनिकचे बालरोगतज्ज्ञ डॉ. रितेश जैन यांच्याकडून दिला जात आहे.
डिसेंबर महिन्यात तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना, गरम पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. लहान मुलांची काळजी घेणे हे एक आव्हान बनत आहे. पण, काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात लहान मुलांना कोमट पाणी प्यायला सांगणे, गरम-उबदार कपडे घालावेत. गरम दूध, हळद आणि सुंठ मिक्स करून दिल्यास फायद्याचे ठरू शकते. असे केल्यास थंडीमुळे होणारा खोकला सर्दी, पडसे याचे प्रमाण कमी होऊ शकते. बाहेरचं खाणं टाळावे. पिझ्झा, कुल्फी, बर्गर थंड पदार्थ टाळावे. पालकांनी याची काळजी घ्यावी.
हेदेखील वाचा : ऐन जानेवारी महिन्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी
थंडीचे दिवस साधारणत: दोन ते तीन महिन्यांपर्यंत असतात. त्यामुळे या दिवसांत लहान मुलांची काळजी घेणे आव्हानात्मक बनते. दूध, दही, केळी, संत्री, मोसंबी, पेरू टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच फळे जर द्यायचेच झाले तर चिकू, अंजिर यांसारखी फळे देता येऊ शकतात. मात्र, ही फळे शक्यतो दुपारच्या वेळेत देण्याचा प्रयत्न करावा. कारण, सकाळी किंवा रात्री दिली तर कफ वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
सर्दी-खोकल्याला घरगुती उपाय काय?
सर्दी-खोकल्यात ओव्याने छाती शेकावी, मध-सुंठ पावडरचे चाटण द्यावे. तसेच कोमट पाणी पिण्यास द्यावे. सर्दी-खोकला हा व्हायरलचा भाग असल्याने तो चार ते पाच दिवस राहू शकतो. मास्कचा वापर करावा. बाहेर गार हवेत जाण्याचे टाळावे. नॉर्मल सदी-खोकल्याला अँटीबायोटिकची गरज नसते. पाच-सहा दिवसांत बरा होतो. ते घरगुती उपायांनी बरे होऊ शकतात. मात्र, जास्त दिवस राहिल्यास तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी?
पहिले सहा महिने मातेच्या दुधावर बाळ अवलंबून असते. त्यामुळे या दिवसांत मातेने विशेष काळजी घ्यावी. जर मातेला काही आजार असेल तर तिने काळजी घेणे गरजेचे आहे. थेट हवेचा संपर्क टाळावा. गार पाणी पिणे टाळावे. आहार हा पोषक असेल, याची खात्री करावी.
सीजनल इन्फ्लूएंजा लस बालकांना द्यावी
लहान मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार होणारे व्हायरल आजार जर टाळायचे असतील तर सीजनल इन्फ्लूएंजा ही लस पालकांनी आपल्या मुलांना द्यावी. याने चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
– डॉ. रितेश जैन, बालरोगतज्ज्ञ, (एमडी)