'परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक'; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान
पुणे : “तरुणांनी मेहनतीला प्राधान्य देत आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत, आपला प्रवास हा बुद्धीचा, कार्याचा, अनुभवाचा असला पाहिजे. तसेच काळाच्या प्रवाहावर आपली मुद्रा उमटवण्यासाठी आणि परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्तीची आवश्यकता आहे,” असे माजी केंद्रीय परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी उपस्थित होते. “विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वप्ने पाहताना जिद्द, निश्चय, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता या गुणांची जोपासना करत मार्गक्रमण करावे, असा संदेश यावेळी बोलताना डॉ . सावजी यांनी दिला. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव होते. तर प्रशासकीय अधिकारी डॉ. सुहास मोहिते यांची विशेष उपस्थित होती.
डॉ. मुळे यांनी आपल्या वक्तृत्वातून सुभाषचंद्र बोस, सी. व्ही. रमण, रविंद्रनाथ टागोर, मदर तेरेसा यांच्या मानवतावादी कार्याची ओळख करून देत प्रश्न, प्रवास, आणि प्रेम या त्रिसूत्रीचा आपल्या जीवनात अंमलबजावणी करावी. तसेच आपल्या मातीवर, माणसांवर आणि आजूबाजूच्या निसर्गावरती भरभरून प्रेम करण्याचा संदेश दिला. अन्न, वस्त्र, निवारा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे असे सांगत या पुढील काळात आपल्या समाजसुधारकांची परिवर्तनाची चळवळ, संतांची समतेची चळवळ समोर ठेवून सकारात्मक परिवर्तनासाठी वाटचाल करणाऱ्या सक्षम युवाशक्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. के. डी. जाधव यांनी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या दूरदृष्टीतून विद्येच्या माहेरघरात निर्माण झालेले आणि स्वतःची एक सामर्थ्यशाली ओळख असलेलं आगळं-वेगळं महाविद्यालय असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाने नेत्रदीपक यश मिळविले असल्याचे नमूद केले.
पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार
प्रास्ताविक प्रसंगी प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी भारती विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेत महाविद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली व विविध शाखांमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच पालकांनी महाविद्यालयाच्या उपक्रमशील कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यास या महाविद्यालयात प्रवेश केले आहे असेही नमूद केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘यशोभारती’या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. सदाशिव पाटील व डॉ. रंजना चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी परिषद, यशोभारती नियतकालिक, कलाभारती, संशोधन, आय.आय. सी.,आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटना, लेडीज असोसिएशन, क्रीडा विभाग, ‘आम्ही यशवंत’ माजी विद्यार्थी संघटना, विद्यार्थी कल्याण मंडळ, वाणिज्य मंडळ, सायन्स असोसिएशन, वृत्तपत्र व जनसंपर्क विभाग आदींसह शैक्षणिक व इतर विविध उपक्रमांविषयीची माहिती संबंधित समन्वयकानी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक म्हणून डॉ. मनिषा मोहिते व प्रा. मयुरी देसले यांनी काम पाहिले. शेवटी दीक्षारंभ समारंभाचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुप्रिया शुक्ला यांनी केले.



