सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाची कामे मुदतीत पुर्ण करा असे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी दिले आहेत. शास्त्रीनगर येथील काम मार्च २०२७ अखेर तर विश्रांतवाडी येथील काम यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शास्त्रीनगर चौक येथील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्प, विश्रांतवाडी ( मुकुंदराव आंबेडकर चौक – विश्रांतवाडी जंक्शन) येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या कामाचा आयुक्तांनी गुरुवारी आढावा घेतला. या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पांच्या कामास गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारास दिल्या.
आगाखान पॅलेस ते गुंजन चौक रस्ता
सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणीनगर व गुंजन चौकाच्या दिशेने जाते. या मार्गांवरील वाहतुकीचा मोठा भार शास्त्रीनगर चौक परिसरात येत असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्त्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
विश्रांतवाडीतील अडचण एका महिन्यात दूर होणार
विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामाच्या पाहणीदरम्यान आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामामध्ये श्री रामेश्वरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे निर्माण होणारा अडथळा आयुक्तांना जागेवर समजावून सांगण्यात आला. सदर अडथळ्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम नियोजित गतीने पुढे नेण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हा विषय एका महिन्यात निकाली काढण्याच्या सुचनाही आयुक्तांनी दिल्या. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे व पिंपरी चिंचवड (एसआरए), बांधकाम विकास विभाग ,नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग तसेच संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक व संयुक्त जागा पाहणी आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात चौकातील वाहतूक वळविल्यानंतर चौक व आळंदी रस्ता बाजूकडील उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारास देण्यात आल्या.



