पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार
पुणे / आकाश ढुमेपाटील : शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्गाचे (रिंग रोड) काम वेगाने सुरू आहे. सुमारे ५२ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातून जाणाऱ्या अवजड व मालवाहतूक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर तसेच अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. एका अर्थाने पुण्याच्या दळणवळणाच्या ‘धमन्या’च या चक्रकार मार्गामुळे मोकळ्या होणार आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून मार्ग काढताना प्रकल्पात १४ मोठे बोगदे, तसेच ९३ पूल आणि व्हायाडक्ट उभारण्यात येणार आहेत. वाहतुकीची जोडणी अधिक सुलभ करण्यासाठी १६ इंटरचेंज प्रस्तावित आहेत. हा चक्राकार मार्ग तब्बल ९ राष्ट्रीय महामार्गांना जोडणार असून, पुणे जिल्ह्यातील ६ तालुके आणि ८२ गावांना त्याचा थेट लाभ होणार आहे. या रिंग रोडमुळे पुणे शहरातून केवळ केवळ जाण्यासाठी येणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच पुढे मार्गस्थ होतील. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होण्याबरोबरच प्रदूषणालाही आळा बसण्याची शक्यता आहे.
सहा ते आठ पदरी चक्राकार मार्ग
महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून येणारी मोठ्या प्रमाणावरील अवजड आणि मालवाहू वाहने सध्या शहराच्या अंतर्गत भागातून मार्गक्रमण करतात. बाह्यवळणाचा प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याने शहरातील वाहतूक कोंडीबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवरहा रिंगरोड प्रवेश नियंत्रित (अॅक्सेस कंट्रोल्ड) पद्धतीने उभारण्यात येत आहे.
चक्राकार मार्ग ६ ते ८ पदरी असणार
सुमारे १७० किलोमीटर लांबीचा हा चक्राकार मार्ग ६ ते ८ पदरी असणार आहे. काँक्रीटच्या या मार्गावर वाहनांना ताशी १२० किलोमीटरपर्यंत वेगाने प्रवास करता येणार आहे. भविष्यात या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्याच्या मध्यभागी आवश्यक जागाही राखीव ठेवण्यात आली आहे.
पश्चिम टप्पा २०२८, पूर्व टप्पा २०२९ खुला
प्रकल्पाचा पश्चिम भाग २०२८ मध्ये, तर पूर्व भाग २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. रिंग रोड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण जवळपास निम्म्याने कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुण्याच्या वाढत्या नागरीकरणाला आणि औद्योगिक विस्ताराला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.



