उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, हा बडा नेता 'घड्याळ' हाती घेणार (फोटो सौजन्य-X)
MLA Mahadev Babar To Join Ajit Pawar NCP : हडपसरचे माजी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांचे माजी नगरसेवक योगेश ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह राष्ट्रवादींना मोठा धक्का बसणार आहे.
मंगळवारी संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर माजी आमदार बाबर हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कायम राहिले होकते. ठाकरेंच्या शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते.
मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार मिळाली होती. त्यामुळे बाबर नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला थेट पाठिंबा देऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली . त्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, बाबर यांनी आता उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असून, ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि योगेश ससाणे,हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे हडपसर मतदारसंघात ठाकरेंसह पवारांना मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
येत्या काळात काही माजी नगरसेवक आणि अधिकारी महाविकास आघाडीत प्रवेश करतील असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. त्यात शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.