कांद्याने पुन्हा केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; सध्या किती आहे दर?
महाळुंगे पडवळ : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रति दहा किलो २०० रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बाबाजी चासकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कांद्याला वाढीव दर मिळतो. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली. मे-जूनमध्ये कांद्याला १८० ते २०० रुपये दर मिळाला. ऑगस्टमध्ये तो १०० ते १५० रुपयांवर घसरला. तर सप्टेंबरमध्ये शंभर रुपयांच्या आत भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बाजारभावात उत्पादन खर्चही भरून निघेणा
कांद्याचा उत्पादन खर्च एकरी तब्बल एक लाख रुपयांपर्यंत येतो. एकरी सरासरी १८० गोण्या उत्पादन मिळते. परंतु सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. साकोरेचे सरपंच अनिल गाडे यांनी सांगितले की, वातावरणातील बदलांमुळे बराकीत कांद्याला वास येत आहे. कांद्याची निवड करताना मोठ्या प्रमाणात चौरे फुटत आहेत आणि दुय्यम दर्जाचा कांदा तयार होत आहे. बाजारात हा कांदा नेला तर त्याला केवळ ३ रुपये किलो भाव मिळतो.
हे सुद्धा वाचा : …मग गेली आठ वर्ष लूट महोत्सव सुरु होता का? काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी
कांदा आडतदार सागर थोरात म्हणाले, “सध्या कांद्याला मागणीच नाही. बाहेरील राज्यांत कांदा जात नाही. निर्यातीबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट धोरण नाही. मोठ्या शहरांपुरतेच विक्रीचे प्रमाण मर्यादित असून अपेक्षित दर मिळत नाहीत.”शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून दहा किलोला २०० रुपये दराने कांदा खरेदी करावा.”स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.