
तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
नगरसेवक सुनील पांडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा करून लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. आपल्या घराण्याला लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेबद्दल सांगताना सुनील पांडे म्हणाले, “आमच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचा समृद्ध आणि पिढीजात वारसा लाभला आहे. हाच वारकरी विचार आणि संस्कृती जपणे हे आमचे कर्तव्य आहे.”
याप्रसंगी पुणेकरांच्या सेवेचा पुनरुच्चार करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला दिला. ते म्हणाले, “पुण्यातील नागरिकांनी मला पुणे महापालिकेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची मोलाची संधी दिली आहे. त्यामुळे ‘जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले; तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ या उक्तीप्रमाणे मी सदैव तत्पर राहून पुणेकरांची आणि गरजूंची सेवा करणार आहे.” वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जपणारे हे अनोखे गणेश आगमन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गणेशभक्तांची आतुरता संपणार आहे, कारण 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटाने साजरी केली जाणार असल्याने सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला सुरुवात आजपासून होत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या कालावधीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल सव्वा सात हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदार शहराच्या रस्त्यावर तैनात राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.