पुण्यात २ हजार विद्यार्थ्यांना हुडीज-जॅकेट्स वाटप(फोटो-istockphoto)
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुलांच्या आरोग्यावर हिवाळ्याच्या तीव्र थंडीमुळे परिणाम होऊ नये, तसेच त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पुणे शहर व पुण्यालगतच्या परिसरातील १८ प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी हुडीज व जॅकेट्स वितरणाचा व्यापक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.
हा सामाजिक उपक्रम गौरव नहार, अक्षय जैन, अमित लोढा, सिद्धार्थ नहार, शुभम लुनावत, आकाश ओसवाल, गौरव बठिया, सुयोग बोरा व साहिल नहार, या युवकांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य व पाठबळ दिल्याबद्दल राजेश नहार, सुभाष नहार, स्नेहल चोरडिया, निकिता नहार, पायल बोरा,प्राजोत , यश नवलखा व कौशभ धोका यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ७ ते १० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एकूण २ हजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हुडीज व जॅकेट्सचे सोबत थंडीचे क्रीम वितरण करण्यात आले. थंडीपासून संरक्षण मिळावे, विद्यार्थी आजारी पडू नयेत, तसेच नियमितपणे शाळेत उपस्थित राहून त्यांचे शिक्षण सुरू राहावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
युवकांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात गरजू नागरिकांसाठी ब्लँकेट्स वितरणाचा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत होता. मात्र, यावर्षी सामाजिक जबाबदारीची दिशा अधिक प्रभावीपणे निश्चित करत, हा उपक्रम प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा निर्णय युवकांनी घेतला. लहान वयातच आरोग्याची योग्य काळजी घेतली गेल्यास त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो, या विचारातून हा बदल करण्यात आला. हा उपक्रम आता पुढील प्रत्येक हिवाळ्यात सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यांत तापमानाच्या पाऱ्यात कमी दिसून आली आहे. यामुळे हुडहुडीचे प्रमाण वाढले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावमध्ये सर्वात जास्त थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठ्यात वाढ झाली आहे. मात्र पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान किमान ९ अंशांवर आले असून उत्तर महाराष्ट्रात पुन्हा शीत लहर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






